- काजू बागांचे मोठे नुकसान ; अज्ञातांवर संशय
चलवेनहट्टी : येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या झोपडीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील ही झोपडी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेतीची अवजारे व इतर साहित्य साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या झोपडीसह आत ठेवलेले सर्व साहित्य आगीत पूर्णतः जळून खाक झाले.
झोपडीला लागलेल्या आगीने परिसरातील काजू बागांनाही मोठा फटका बसला. आगीच्या लपटांमुळे शेजारील शेतकऱ्यांच्या काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक लहान रोपेदेखील जळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गुड्डादेवी मंदिर परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या काही युवकांकडून वारंवार पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी मद्यपान, भांडणे, तसेच सिगारेटचे थोटके बेदरकारपणे टाकल्यामुळे अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात नियमित गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी चलवेनहट्टी, अगसगे, अतिवाड व बेकीनकेरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.







