• ज्योती सेंट्रल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकांकडून कौतुक

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची विशेष सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी पालक व शिक्षकांना आपल्या अविरत कष्टसाधनेतून व अनुभवी ज्ञान-कौशल्याच्या आधारे मार्गदर्शन केले.

प्राचार्य पाटील म्हणाले, “आधुनिक काळात मुलांना प्रसंगानुरूप मोबाईलचा वापर करावाच लागतो. मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सुवर्णमध्य साधता येतो. जर हाच मोबाईल तुम्ही टी.व्ही. ला कनेक्ट करून दिलात, तर विद्यार्थी मोबाईलवर इतर वेगळ्या गोष्टी न पाहता, मोठ्या पडद्यावर केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करेल. यामुळे अभ्यास अधिक प्रभावी होईल.”

याप्रसंगी उपस्थित काही पालकांनी शाळेविषयी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. शाळेत नवनवीन उपक्रमांद्वारे सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम अतिशय सोप्या पद्धतीने शिकविला जात असल्याने विद्यार्थ्यांना समजण्यास सुलभ जात आहे. तसेच प्राचार्यांचे अनुभवी व विचारपूर्वक मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरत आहे, असे गौरवोद्गार पालकांनी काढले.

या सभेला शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी, इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.