• सुदैवाने मोठा अनर्थ टळला

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव कॉलेज रोड परिसरात दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास चालू असलेल्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. लिंगराज कॉलेजसमोर घडलेल्या या घटनेत, आग दिसताच चालकाने तत्परता दाखवत कार रस्त्याच्या कडेला उभी केली.

अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचत कारमधील आग काही मिनिटांतच विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक चौकशीत बॅटरीमध्ये झालेल्या संभाव्य शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून जीवितहानीही घडली नाही. आगीमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.