• पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरातील बसस्थानके, पदपथ आणि उद्यानांमध्ये वाढत चाललेल्या अस्वच्छतेच्या समस्येकडे लक्ष वेधत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचालवार यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त पातळीवर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या निराश्रित कुटुंबांच्या सुरक्षित पुनर्वसनाचीही त्यांनी मागणी केली आहे.

सुदाम हरिविजय मंचालवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे रेल्वे स्टेशन बसस्थानक, गोगटे सर्कल आणि मिलिटरी महादेव मंदिर परिसराची पाहणी केली. या वेळी अनेक कुटुंबे सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेत असल्याचे तसेच परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

या परिस्थितीचा परिणाम खानापूरसह विविध भागांतून येणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांच्यावर होत असून स्वच्छता मोहिमांनाही अडथळे निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. आर्थिक अडचणी आणि बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबे सार्वजनिक ठिकाणी राहण्यास मजबूर झाल्याचेही समोर आले आहे.

पावसाळा जवळ आल्याने महिला आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन आणि महापालिकेने संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंचालवार यांनी केली आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे शासकीय निवारा केंद्रे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे आणि सामाजिक संस्थांनीही या पुनर्वसन मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.