- महापालिकेच्या ठरावाला १० वर्षे उलटूनही अंमलबजावणी नाही
- २६ जानेवारीला निषेधाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर होऊन तब्बल दहा वर्षे उलटूनही किल्ला तलाव परिसरात भगवान बुद्धांची मूर्ती आणि केएलई सर्कल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला नसल्याबद्दल दलित संघर्ष समितीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आजच्या महापालिका बैठकीत या विषयावर अंतिम निर्णय घेतला नाही, तर २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणास विरोध करून काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा समितीने दिला आहे.
या मागणीसाठी दलित संघर्ष समितीने आज बेळगाव महापालिकेसमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. २०१६ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किल्ला परिसरात १०० फूट उंच भगवान बुद्धांची मूर्ती आणि केएलई सर्कलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी, दिवंगत माजी आमदार संभाजी पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, दहा वर्षे लोटूनही यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महापुरुषांचा अपमान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आंदोलकांनी प्रादेशिक आयुक्तांनी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी, अशी मागणी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उत्तरचे आमदार आसिफ सेठ, महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करत त्यांची मागणी ऐकून घेतली.
या आंदोलनात दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








