- वाल्मिकी राज्य युवा घटकाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा घटकाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील ‘तलवार’ जातीची खोटी जात प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या व्यक्तींसह अशी प्रमाणपत्रे देणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

वाल्मिकी नायक समुदायाच्या विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर सातत्याने लढा देत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जमाती कल्याण विभागाने ११ वेळा स्मरणपत्रे देऊनही बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदारांनी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिकी समुदायावर मोठा अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
निवेदनानुसार, केवळ बेडा, वाल्मिकी, नायक आणि नायकडा या समुदायांतील ‘तलवार’ पोटजातीलाच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार आहे. मात्र अंबिग, बेस्ट, सुणगार (प्रवर्ग-१) यांसारख्या इतर समुदायातील काही व्यक्तींनी स्वतःला ‘तलवार’ असल्याचे खोटे दाखवून बेकायदेशीररीत्या एसटी प्रमाणपत्रे मिळवली आहेत.
‘कर्नाटक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय नियुक्ती आरक्षण कायदा १९९०’ मधील कलम ४-एफ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना अशा बनावट प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. तरीही अद्याप ही प्रमाणपत्रे रद्द का करण्यात आली नाहीत आणि दोषी तहसीलदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवलेल्या व्यक्तींची नियुक्तीही तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणाचा तातडीने निकाल न लागल्यास वाल्मिकी समुदायाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात ‘न्यायालय अवमान’ याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भात जिल्हा समाज कल्याण विभाग आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागालाही निवेदने देण्यात आली आहेत.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिगीहळ्ळी, प्रदेश संघटन सचिव मल्लेश्व मुळगशी, बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष लक्ष्मण बागडी, शहर अध्यक्ष मंजू तलवार, उपाध्यक्ष सचिन के., शुभम तलवार, आदर्श दनदमणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








