• दहा मार्चला ‘चला आझाद मैदान’ आंदोलनाचा निर्धार

बेळगाव / प्रतिनिधी

मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांतील कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घरे मिळावीत, या मागणीसाठी १० मार्च २०२६ रोजी ‘चला आझाद मैदान’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (७ मार्च) दुपारी १२ वाजता बोडकेनहट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळामा देवी मंदिरात गिरणी कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

एकेकाळी मुंबईत कापड गिरण्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. त्या काळात सीमाभागातील, विशेषत: बेळगाव जिल्ह्यातील कामगारांची संख्या लक्षणीय होती. या गिरणी कामगारांनी मुंबईच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले. मात्र १९९० साली महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेने गिरण्यांच्या जागांचा वापर व्यावसायिक व निवासी कारणांसाठी करण्यास परवानगी दिल्यानंतर अनेक गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कामगार बेरोजगार झाले.

श्रमिक संघटनांच्या आंदोलनानंतर शासनाने गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना घरे देण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत श्रमिक संघटनेतर्फे कॉ. उदय भट, कॉ. दत्तात्रय आत्याळकर व कॉ. अतुल दिघे मार्गदर्शन करणार आहेत. चलवेनहट्टी, बोडकेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर आदी भागातील गिरणी कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहर हुंदरे, राजू तवनोजी, बाळू पाटील, जोतिबा पाटील व केदारी पाटील यांनी केले आहे.