बेळगाव / प्रतिनिधी

हासन येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळूर पब्लिक स्कूलतर्फे आयोजित ३६ वी विद्याभारती राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना संतमीरा अनगोळ शाळेची भावना भाऊ बेरडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले.

१७ वर्षाखालील मुलींच्या लांबउडी स्पर्धेत भावनाने ४.६९ मीटर उडी मारली आणि कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत दक्षिण क्षेत्राच्या लक्षा रेड्डी हिने सुवर्ण, तर रितिका प्रजापतीने रौप्यपदक पटकावले. तिहेरी उडीत भावनाने ९.७८ मीटर उडी मारत रौप्यपदक मिळवले आणि आपली राष्ट्रीय पातळीवरील क्षमता सिद्ध केली.

स्पर्धेनंतर शाळा गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य मुखतेश बदेशा, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर आणि मंगळूर पब्लिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रराज यांच्या हस्ते भावनाला पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

भावना बेरडेला क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार आणि अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी तसेच पालकांनी तिचे सतत प्रोत्साहन केले. भावनाच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेत आणि बेळगावच्या क्रीडावर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.