• बेनकनहळ्ळी येथील घटना : संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

बेळगाव : भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील सैनिक कॉलनी जवळ आज सोमवारी दुपारी १२ वा. सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मल्लाप्पा पाटील (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, शेतकरी मल्लाप्पा पाटील हे गणेशपूर येथून सायकलने बेनकनहळ्ळीकडे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, ट्रकच्या चाकाखाली सापडून ते जागीच गतप्राण झाले.   

या घटनेनंतर बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले. यावेळी एफसी गोडाऊनच्या गाड्या या मार्गावरून का चालतात असा आक्षेप घेऊन ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या रास्तारोको आंदोलनामुळे बेळगाव – बेळगुंदी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. या घटनेची नोंद वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला जाणार असून सायंकाळी ७.३० वा. अंत्यसंस्कार होणार आहे.