बेळगाव / प्रतिनिधी

शहरातील न्यायालयाच्या एका वकिलावर आवारात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वकिल जहीर अब्बास हुक्केरी हे केस संपवून बाहेर पडत असताना त्यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच दगड आणि रॉडने हल्ला केला. गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून न्यायालय आवारात त्यांच्या पालकांमध्ये हाणामारी झाली.

यावेळी सोयल इनामदार याच्यासोबत असलेल्यांनी ॲड. जहीर अब्बास हुक्केरी याच्यावर दगड, विटांनी हल्ला केला. ॲड. जहीर यांच्या डोक्याला, कानाला, नाकाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. न्यायालयाच्या आवारात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हा परिसर गजबजलेला असतो. अशावेळी हा प्रकार घडल्याने धावपळ उडाली.