बेळगाव / प्रतिनिधी
शहरात रस्त्यांची दुर्दशा झाली असून, भाजी मार्केटमध्ये भाज्या घेऊन जाणारा एक मिनी टेम्पो उलटून अपघात घडला. या अपघातात महिला व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले. शहरातील भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोडवर एका खड्डयात अडकून मिनी टेम्पो उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व भाज्या रस्त्यावर विखुरल्याने महिला व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
रस्त्यावरील खड्डड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना रस्ता दिसत नाही आणि यामुळे अपघात होत आहेत. या आर्थिक नुकसानीमुळे महिला व्यापाऱ्यांनी अश्रू ढाळले. “आम्हाला दररोज भाजी मार्केटमध्ये ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आधीच महागाईने हैराण झालो आहोत आणि त्यातच या अपघातामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी महिला व्यापाऱ्यांनी केली.” हा अपघात खराब रस्त्यांमुळे झाला. त्यामुळे तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी वाहनचालकाने केली. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.