बेळगाव / प्रतिनिधी
बेंगळुरू – बेळगाव वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ झाल्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली बेळगावकरांची मागणी पूर्ण झाली असून दिवंगत खासदार सुरेश अंगडींचे स्वप्न साकार झाल्याचे मत बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षभरापासून अधिक काळ बहुप्रतिक्षित असलेल्या बेंगळुरु – बेळगाव वंदे भारत रेल्वेला रविवार दि. १० ऑगस्ट रोजी बेंगळुरु येथे एका विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर रात्री ८.३० वा. बेळगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना विनय कदम पुढे म्हणाले, बेळगावपासून राजधानी बेंगळुरु पर्यंत सुपरफास्ट रेल्वे सुरू करावी अशी बेळगावकरांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती , यासाठी दिवंगत खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही प्रयत्न केले होते.
अखेर विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी सातत्याने पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बेंगळुरु – बेळगाव वंदे भारत रेल्वे सुरू केल्यामुळे त्यांनी खासदार जगदीश शेट्टर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. याप्रसंगी भाजपचे आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.