• कर्नाटक सरकारची घोषणा

बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये विजय परेड काढण्यात येत होती. मात्र, या कार्यक्रमावेळी अचानक एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला तसेच ४७ जण जखमी झाले. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, या मदतीत आता वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे आता या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, “चिन्नास्वामी स्टेडियममधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती”, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनेही म्हटले आहे की कर्नाटक सरकारच्यावतीने पीडितांच्या कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदतीव्यतिरिक्त जखमी झालेल्यांसाठी एक मदत निधी स्थापन करण्यात येईल.