बेळगाव / प्रतिनिधी

कर्तव्य बजावताना पोलीस अधिकाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या धैर्य, समर्पण व कर्तृत्वावर त्यांच्या सेवेत यश अवलंबून असते. सण-उत्सव साजरे करताना अनेक नागरिक आनंद घेत असताना, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या पोलीस दलाच्या कार्याची महत्त्वाची भूमिका आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केले.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस घटकांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील पोलीस परेड मैदानावर ‘पोलीस हुतात्मा दिन’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी एन. व्ही. बरमणी आणि इतर पोलीस अधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमात, कर्तव्य बजावताना दिलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून हुतात्मा पोलिसांच्या स्मरणार्थ पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तसेच हवेत गोळीबार करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुतात्मा पोलीस अधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या सेवेला गौरवून आदरांजली वाहिली. २४ ऑक्टोबर १९५९ रोजी सीआरपीएफचे जवान चीनसोबतच्या युद्धात हुतात्मा झाले होते.

“सण-उत्सव आपल्यासाठी असले तरी, पोलीस अधिकारी दिवसरात्र कष्ट करून देशाची सेवा करतात. हुतात्मा पोलीस अधिकाऱ्यांची नावे सदैव स्मरणात राहतील. त्यांनी पाहिलेले स्वप्ने आपण पूर्ण करूया, आणि शांतता व ऐक्याच्या बांधणीत सहभागी होऊया,” असे डॉ. गुळेद यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध पोलीस विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.