• व्यापारी पुन्हा सरकारी मार्केटमध्ये परतले

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील फुलांच्या घाऊक बाजारपेठेवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला असून व्यापारी पुन्हा अधिकृत सरकारी मार्केटमध्ये परतले आहेत. आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरात सुरू झालेल्या खासगी बाजारपेठेवर ‘एपीएमसी’ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी नोंदवला होता. यानंतर आमदार सेठ यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नियमबाह्य व्यवहार सहन केले जाणार नाहीत आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय बैठकीत घेण्यात आला.

व्यापाऱ्यांना अधिकृत परवाने देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, घाऊक व्यापारी आयेशा सनदी यांनी खासगी बाजारात गेलेल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना पुन्हा सरकारी मार्केटमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला.

जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले की, अधिकृत बाजारपेठ उपलब्ध असताना खासगी घाऊक बाजारांना परवानगी दिली जाणार नाही. उद्यानविद्या विभागाच्या नियंत्रणाखालील मार्केटमध्ये गाळ्यांची संख्या वाढवून अधिकृत ‘सब-मार्केट’ सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विनाअडथळा अधिकृत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार असून व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.