• महापालिकेत पुन्हा भाजपचा झेंडा
  • जातीय समीकरण साधत दोन्ही पदांवर विजय

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रीती कामकर तर उपमहापौरपदी हनुमंत कोंगाळी यांची आज झालेल्या निवडणुकीत निवड झाली. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने दोन्ही पदांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

भाजपने यावेळी सामाजिक समतोल राखत महापौरपद नेकार समाजाला आणि उपमहापौरपद लिंगायत समाजाला देण्याचा निर्णय घेतला. प्रीती कामकर आणि हनुमंत कोंगाळी यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून बहुमताच्या जोरावर विजय मिळवला. काँग्रेसकडून महापौरपदासाठी खर्शीद मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी मोदिनसाब मतवाले यांनी उमेदवारी दिली होती; मात्र त्यांना यश मिळू शकले नाही.

निवड जाहीर होताच महानगरपालिकेत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शहराच्या विकासासाठी गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.