बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी,आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला बेळगाव परिसरातील मराठा बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गे, धर्मवीर संभाजी चौक येथे मोर्चाची सांगता झाली.
पूर्वी मराठी समाज इतरांची सेवा करत असे. मात्र, आता त्यांना सर्व क्षेत्रात संधींपासून वंचित ठेवले जात आहे. तेव्हा सद्यस्थितीत मराठा समाजासाठी आरक्षण देखील आवश्यक आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारने तातडीने विधानसभेचे अधिवेशन बोलावावे आणि मद्रास आणि पंजाबप्रमाणे आरक्षण वाढवावे अशी मागणी सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांनी केली. तसेच आजच्या मोर्चाला मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तर रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, मराठा समाज आज भूमिहीन आहे. शेतकरी संकटात आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते समाजातील गरीब वर्गासाठी चांगले होईल. गरीब मुलांना शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल. मराठा समाज इतरांचे हक्क मागत नाही. आम्ही आमचे हक्क मागत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाने नेहमीच दलितांना पाठिंबा दिला आहे. आता दलित समाज आरक्षणासाठी मराठा समाजाला पाठिंबा देत आहे. दलित नेते महांतेश तलवार म्हणाले की, गरिबांचे राहणीमान सुधारण्यासाठी आरक्षण देणे आवश्यक आहे. यावेळी ॲड. अमर यळ्ळूरकर यांनी आरक्षणाचे महत्त्व आणि स्वरूप याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आम्ही पाठिंबा देतो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मुंबईत आंदोलन करणाऱ्या देशभर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे, असे सागर पाटील म्हणाले.
आजच्या मूक मोर्चात बेळगाव शहर उपनगर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजातील बंधू-भगिनींनी बहुसंख्येने सहभागी झाले होते.