• कडक उन्हापासून दिलासा
  • अचानक पावसामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी दिवसभर कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना संध्याकाळी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिवसभर उष्णतेचा तडाखा सहन केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसाने जोरदार सुरुवात केली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना आडोशाला थांबावे लागले. काही भागात लोक दुकाने व इमारतींच्या आवारात उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहताना दिसून आले.

दरम्यान, या पावसाचा परिणाम शहरातील एपीएमसी बाजारावरही झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बाजारातील व्यवहार काही काळ विस्कळीत झाले. विक्रीसाठी आणलेली पिके पावसापासून वाचवण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना धावपळ करावी लागली. तसेच पावसामुळे काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले.