बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात एका ऑटो चालकाने किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंग्राळी येथील किरण मनगुतकर (वय ५४) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण यांनी मुलीचे लग्न केले होते आणि गेल्या महिन्यातच तिला बाळ झाले आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून ते ऑटो चालवत होते. एकदा ते म्हणाले होते की, त्यांना कर्ज झाले आहे. मार्केट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, जलतरणपटूंच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही दुःख झाले. किरण यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे. किल्ला तलावात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.