बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी हानीकारक मांजा धाग्याच्या विक्रीवर कायदेशीर कारवाई केली आहे.
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हानीकारक मांजा धाग्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या गळ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या धाग्याच्या विक्रीवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशानुसार मार्केट आणि एपीएमसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकण्यात आले. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतवाल गल्ली येथील दुकानमालक फारुख अहमद गुलाब अहमद मुल्ला यांच्या दुकानातून मांजा धाग्याचे रोल जप्त करण्यात आले. तसेच, एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव नगर येथील दुकानमालक जमीर कुतुद्दीन कशणट्टी यांच्यावरही कारवाई करत मांजा धाग्याचे रोल जप्त करण्यात आले आहेत.

