बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. मारीहाळ आणि खडेबाजार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राबवलेल्या स्वतंत्र मोहिमांमध्ये अवैध दारू विक्री करणारा एक आरोपी आणि अंमली पदार्थांचे सेवन करणारा आणखी एक जण अशा दोघांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
मारीहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांबरा गावात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. महादेव नगर येथील रहिवासी संदीप रामचंद्र नाईक हा उडुपी टी स्टॉलजवळ अवैधरीत्या दारू विकत असताना एएसआय एम. एस. रुद्रापूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला अटक केली. या कारवाईत ४०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खडेबाजार पोलिसांनी शिवाजी रोडवरील बेलडक चिकन सेंटरजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या मुजाहिद वहीद अहमद नायकवाडी याला ताब्यात घेतले. पीएसआय आनंद आदगोंडा यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत त्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही यशस्वी कारवायांबद्दल पोलिस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी संबंधित पथकांचे अभिनंदन केले आहे. शहरात अवैध व्यवसाय आणि गैरकृत्यांवर कारवाईची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.







