बेळगाव / प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे – पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल सकल मराठा समाज बेळगावतर्फे बुधवारी सकाळी शहरातील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे – पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला काल मंगळवारी यश आले असून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबरच आज बेळगाव मधील सकल मराठा समाजाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शहरातील असलेल्या मुख्य धर्मवीर चौक छ.संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीला आज बुधवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याद्वारे, तसेच फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाईचे वाटप करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाज बेळगावचे प्रमुख नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सकल मराठा समाज समन्वयक प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण-पाटील आदींनी छ. संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून नमन केले. यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य समाज बांधवांनी छ. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छ. संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा वगैरे घोषणा देऊन चौक दणाणून सोडला होता.