• आठ जणांना अटक : ५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर पोलिसांनी शहरातील विविध भागांत एकाच वेळी धडक कारवाई करत जुगार, दारू तस्करी आणि गांजा विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एपीएमसी पोलिसांनी पत्त्यांच्या जुगारात गुंतलेल्या समीर पठाण, बबन जोशी, सलीम लष्करवाले आणि इलियास पठाण यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याचवेळी मार्केट पोलिसांनी मटका जुगार चालवणाऱ्या दीपक सावंत याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली.

दरम्यान, सीसीबी पोलिसांनी खानापूर रोड परिसरात कारवाई करून बागलकोट जिल्ह्यातील हनुमंत नायकर आणि रमेश मुळीमनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुझुकी कारसह सुमारे पाच लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. तसेच माळमारुती पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणात राहुल बंती याला अटक केली आहे.

यासर्व कारवायांमध्ये एकूण ५ लाख २४ हजार ४४६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही संयुक्त कारवाई एपीएमसीचे एएसआय संजय होनवाड, मार्केटचे पीएसआय हुसेनसाब केरूर, सीसीबीचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि माळमारुतीचे पीएसआय श्रीशैल हुलगिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रभावी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व संबंधित पथकांचे विशेष कौतुक केले आहे.