- इंडिगोची घोषणा ; सहा शहरांसाठी एटीआर उड्डाणे
मुंबई : इंडिगो कंपनीने आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सहा देशांतर्गत शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. २९ मार्च २०२६ पासून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर या शहरांना सेवा उपलब्ध होणार असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे.
कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, या मार्गांवर एटीआर विमानांचा वापर करण्यात येणार आहे. प्रादेशिक संपर्क वाढवणे आणि नवी मुंबईतील उपस्थिती मजबूत करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. या नव्या उड्डाणांमुळे महानगरांमधून टियर-२ आणि टियर-३ शहरांकडे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
या सेवांसाठी तिकिट बुकिंग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून, इंडिगोची अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप तसेच अधिकृत ट्रॅव्हल एजंट्समार्फत तिकिटे उपलब्ध असतील. एटीआर नेटवर्कचा विस्तार करून पर्यटनाला चालना देणे, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि लहान शहरांना मोठ्या महानगरांशी जोडणे हे कंपनीच्या व्यापक धोरणाचा भाग असल्याचे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








