बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदांची मुदत संपत आल्याने नव्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आयुक्त कार्तिक एम. यांनी विभागीय आयुक्तांकडे अधिकृत पत्र पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी आयुक्तांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्याच्या महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे.
आगामी निवडणुकीत महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी, तर उपमहापौरपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत ५८ नगरसेवकांसह ७ आमदार, खासदार व मंत्री असे एकूण ६५ सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.








