बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काल झालेल्या बैठकीत ठरवण्यात आला.
खानापूर रोड येथील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिरात झालेल्या बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीत महामेळाव्याचे आयोजन निश्चित करून त्याच्या तयारीबाबत चर्चा झाली.
या बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये आर. आय. पाटील, लक्ष्मण होणगेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, नारायण कालकुंद्री यांचा समावेश होता.
बैठकीनंतर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा इतिहास १९५६ पासून चालू आहे आणि अनेक आंदोलनांनंतरही मुद्दा कायम राहिला आहे. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने हा दावा सर्वोच्च न्यायालयात नोंदविला. त्यानंतर २००६ मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे मराठी भाषिकांचा महामेळावा दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केला जातो. समितीचे उद्दिष्ट आहे की, मराठी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणे आणि हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या हक्कांवर होणारा दबाव कमी करणे.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, सध्याच्या सुगीच्या मोसमामुळे बैठकांत सहभागी कार्यकर्त्यांची संख्या थोडी कमी असली तरी, प्रत्येक कार्यकर्ता आपल्या गावात जनजागृती करेल आणि महामेळाव्याच्या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास समितीला आहे.








