- वादळ आणि पावसामुळे प्रकाश संपगावी यांच्या घर आणि गोठ्याचे छप्पर उडले
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील गांधीनगर, लक्ष्मी गल्ली क्रॉस येथे राहणारे प्रकाश संपगावी यांच्या कुटुंबाला वादळाचा मोठा फटका बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे त्यांच्या घराचे आणि गोठ्याचे छप्पर पूर्णपणे उडून गेले आहे. गेल्यावेळी आगीमुळे नुकसान सहन केलेल्या या कुटुंबावर आता जणू जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे नैसर्गिक संकट ओढवले आहे.
प्रकाश संपगावी यांच्या घरात पाच जण राहतात आणि आठ जनावरे आहेत. दुग्धव्यवसाय हाच त्यांच्या उपजीविकेचा एकमेव स्रोत आहे. पावसाच्या सुरुवातीस गोठ्याचे छप्पर म्हशींवर पडले, मात्र स्थानिक तरुणांनी तत्काळ हस्तक्षेप करून जनावरे सुरक्षित बाहेर काढली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र घरातील सुके गवत आणि चारा पूर्णपणे खराब झाले असून, निवारा आणि अन्नाशिवाय कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे.
घराचे मालक, प्रकाश संपगावी, वृद्ध असून काम करण्यास असमर्थ आहेत. “मुले काही काम करत नाहीत, आम्ही म्हातारे झालो आहोत. गुढीपाडवा साजरा करण्याऐवजी आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. घरातील पाच सदस्यांसह आठ गुरे असून, गोठा आणि घराचे छप्परही उडून गेले. वाळलेले गवत पावसामुळे खराब झाले, त्यामुळे दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेले हे कुटुंब आता गंभीर संकटात आहे.
पीडितांनी मागणी केली आहे की स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासन या गरीब कुटुंबासाठी तातडीने धाव घ्यावी, योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्या जीवन व उपजीविकेची योग्य सोय करावी.








