बेळगाव / प्रतिनिधी

शहर पाणीपुरवठा व भुयारी गटार मंडळातील कार्यकारी अभियंता १ लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोमवारी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथील यासीन पेंढारी यांच्या मालकीची जमीन अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यात शासनाने १८ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. मात्र, संबंधित भरपाईचा चेक देण्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांनी यासीन पेंढारी यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची तक्रार यासीन पेंढारी यांनी थेट लोकायुक्त कार्यालयात दाखल केली. पोलिस अधीक्षक हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचून विश्वेश्वरय्यानगर येथील पाणीपुरवठा कार्यालयात लाच स्वीकारताना शिरूर यांना रंगेहाथ अटक केली.

या कारवाईत लोकायुक्त पोलिस निरीक्षक गोविंदगौडा पाटील, रवी मावरकर, गिरीश शशीधर, सुरेश आणि मल्लिकार्जुन थईकार यांनी सहभाग घेतला. लोकायुक्त पोलीस प्रमुखांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. या घटनेनंतर शहर पाणीपुरवठा विभागासह सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.