बेळगाव / प्रतिनिधी

शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे किमान तापमान थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. पहाटे व सायंकाळनंतर गारठा अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा इशाराही दिला आहे.

ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी दाट धुके पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. किमान तापमानात झालेल्या घटेमुळे थंडीचा प्रभाव अधिक वाढलेला दिसून येत आहे.

थंडी वाढल्याने नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर वाढवला असून बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, शाल यांसारख्या उबदार कपड्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. थंडीचा हा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.