• तिकीट दरातही कपात : प्रवाशांना दिलासा

बेळगाव : बेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेसला आता पुन्हा पॅसेंजरचा दर्जा दिला जाणार आहे. बुधवार दि. १५ ऑक्टोबरपासून ही पॅसेंजर कायम केली जाणार आहे. यामुळे तिकीट दरातही कपात होणार आहे.

कोरोनाच्या काळात बेळगाव – मिरज पॅसेंजर बंद करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या महापुराच्या काळात रस्ते वाहतूक बंद झाल्याने ही पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु तात्पुरत्या स्वरुपात रेल्वे सुरू करण्यात आल्याने तिला अनारक्षित एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे पॅसेंजरपेक्षा अधिक तिकीट दर असल्याने प्रवाशांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.

बेळगाव-मिरज या रेल्वेमुळे अनेक प्रवाशांना बेळगाव नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त ये-जा करणे सोयीचे ठरते. त्यामुळे ही रेल्वे कायमस्वरुपी करण्याची मागणी केली जात होती. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी यासंदर्भातील पत्र नैऋत्य रेल्वेला पाठविले होते. आता १५ ऑक्टोबरपासून रेल्वेला पॅसेंजरचा दर्जा दिला जाणार असून कायमस्वरुपी केली जाणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सकाळी ५.४५ वाजता बेळगावमधून निघालेली रेल्वे सकाळी ९ वा. मिरज येथे पोहोचेल. तर सकाळी ९.५५ वाजता मिरज येथून निघालेली रेल्वे दुपारी १ वाजता बेळगावला पोहोचेल. दुपारी १.३० वाजता बेळगावमधून निघालेली रेल्वे सायंकाळी ४.३० वाजता मिरज येथे पोहोचेल. तर सायंकाळी ७. १० वाजता मिरज येथून निघालेली पॅसेंजर १०.२५ वाजता बेळगावला पोहोचणार आहे.