बेळगाव : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या आणि जनगणना कामामुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने निवळला आहे. जनगणनेमुळे बदल्या थांबवल्याने अनेक शिक्षक अडचणीत सापडले होते, मात्र आता या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे.

या संदर्भात कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ तसेच माध्यमिक शाळा शिक्षक संघाच्या बेळगाव युनिटतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. जनगणनेचे नियोजन करताना शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अडथळे येऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली होती.

पूर्वी जनगणना प्रक्रियेच्या कारणास्तव बदली व पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना १५ मेनंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून बदली झालेल्या शिक्षकांनी नवीन ठिकाणी रुजू व्हावे आणि त्यानंतर जनगणनेचे काम पूर्ण करावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला.

या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आवश्यक ती पावले उचलली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी दिली. या बैठकीस गजानन सोगलन्नवर, रमेश धोणी यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.