- सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
बेळगाव : शहरातील क्लब रोडवरील नामांकित ईफा हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत हॉटेलमधून दाट धूर निघत असल्याचे लक्षात येताच सतर्क कर्मचाऱ्यांनी तातडीने ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या काही नागरिकांशी हॉटेल कर्मचाऱ्यांचा वाद झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.








