• शांतता राखण्यासाठी पोलिस आयुक्तांची कारवाई

बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करत गांजा विक्रीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ५५ आणि ५६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये हलगा येथील पिराजी यल्लाप्पा यसुची, टिळकवाडीतील यश गणेश दावले व आदित्य गणेश दावले, पार्वती नगरमधील संतोष गोविंद दिवटगी आणि मच्छे येथील रफिक महंमद रफिक इश्तियाक शेख यांचा समावेश आहे.

यापैकी रफिक शेख याला तीन महिन्यांसाठी, तर उर्वरित चौघांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बेळगाव जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.