- तिघे अटकेत
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका – जुगार व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तिघांना रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे.
देशपांडे गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार चालवताना मंजुनाथ यल्लाप्पा तिगडी याला पोलिसांनी पकडले. ही कारवाई काकती पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर यांच्या पथकाने केली असून, याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तसेच, मण्णूर येथील डायट कॉलेजजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून बजरंग अशोक कदम आणि अजित मारुती डोणकरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काकती पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद यांच्या पथकाने केली. आरोपींकडून रोख रक्कम आणि मटक्याशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या दोन्ही प्रकरणांत कर्नाटक पोलीस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.








