- ७२८ रोजगारांच्या संधी रोजगाराच्या संधी
बेळगाव : येथे तिन्ही संरक्षण दलाच्या माजी सैनिकांचा मेळावा आणि रोजगार मेळावा द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि रेकॉर्ड्स, द मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने, मुख्यालय दक्षिण भारत क्षेत्र तसेच कर्नाटक व केरळ सब एरियाच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता.
कर्नाटक व केरळ सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल भरत मेहतानी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, ओ आय सी रेकॉर्ड्स आणि स्टेशन कमांडर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री के. एन. शिवकुमार, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बेलगावी आणि एअर कमोडोर सूरज शंकर, कमांडंट, एअरमेन ट्रेनिंग स्कूल, सांबरा यांचीही उपस्थिती होती.
या मेळाव्यात सुमारे ५,२३० माजी सैनिक, वीर नारी व कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. मेळाव्यात उल्लेखनीय सेवा बजावलेल्या दोन ज्येष्ठ माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. द मद्रास रेजिमेंटचे माजी सैनिक सुभेदार शांतय्या यांनी १७ वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावली असून १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक संघर्षांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता . त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी त्यांना सेना मेडल प्रदान करण्यात आले होते. १९७२ मध्ये त्यांचा तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी वैयक्तिकरित्या सन्मान केला होता.
तसेच मराठा लाईट इन्फट्रीचे जवान दत्तू पाटील वय १०३ वर्षे, यांनी १९४३ ते १९४६ या कालावधीत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सेवा बजावली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना १९३९–४५ स्टार, बर्मा स्टार आणि वॉर मेडल प्रदान करण्यात आले. त्यांचा लष्करी वारसा चार पिढ्यांपर्यंत कायम असून त्यांचे पुत्र १९ मराठा मध्ये, तर नातू आणि पणतू कॉर्प्स ऑफ सिग्नल्समध्ये सेवेत आहेत. दोन्ही ज्येष्ठ माजी सैनिकांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवा व राष्ट्रासाठीच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
मेळाव्यात २१ रेकॉर्ड्स कार्यालये तसेच विविध संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी पेन्शन, कागदपत्रे, आधार व पॅन , बँकिंग आणि इतर कल्याणकारी सेवांसाठी मार्गदर्शन करून सुविधा उपलब्ध करून दिल्या.
यावेळी मेजर जनरल भरत मेहतानी यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. रोजगार मेळाव्यात २४ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यात ७२८ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.







