• अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडर तसेच पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, एखाद्या पेट्रोल पंपावरील साठा संपल्यास पाच तासांच्या आत पुनर्पुरवठा करण्याची व्यवस्था कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंधन कंपन्या आणि पंप मालकांशी चर्चा करून कुठेही टंचाई नसल्याची खात्री करण्यात आली आहे. नागरिकांनी साठवणुकीसाठी गर्दी केल्यामुळेच संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंपांवर बाटल्या किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई करण्यात आली असून, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनीही स्पष्ट केले की, पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. अवैध साठवणूक किंवा चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांनी ‘११२’ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा आणि शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन तसेच हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै उपस्थित होते.