• अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे गौरवोद्गार
  • सीपीएड मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा

बेळगाव / प्रतिनिधी

शहराचा झपाट्याने बदललेला चेहरा, आधुनिकतेकडे वाटचाल करणारा बांधकाम व्यवसाय आणि एका छताखाली सर्व सुविधा – या सगळ्यांचा अनुभव देणारे क्रेडाई बेळगावचे आठवे बेल्कॉन प्रदर्शन बेळगावकरांच्या कायम लक्षात राहील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.

सीपीएड मैदानावर गुरुवारी सायंकाळी बेल्कॉन ८ व्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, शहर उत्तरचे आमदार राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, क्रेडाई कर्नाटकचे उपाध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा, क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, बेल्कॉन इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, तसेच सुधीर पनारे, आनंद कुलकर्णी, अभिषेक मुतकेकर, करुणा हिरेमठ आणि यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, “दहा वर्षांपूर्वी बेळगावला आले होते, मात्र आज संपूर्ण शहराचा कायापालट झालेला दिसतो. इतक्या भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेले बेल्कॉन प्रदर्शन हे ऐतिहासिकच आहे. एका छताखाली आधुनिक बांधकाम क्षेत्रातील सर्व माहिती मिळणार असल्याने हे प्रदर्शन नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.” बेळगावकरांनी केलेल्या प्रेमळ स्वागताने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार राजू सेठ यांनी शहरांसोबतच बेळगावसारख्या उदयोन्मुख शहरांचा वेगाने विकास होत असल्याचे सांगत, त्यामध्ये सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह क्रेडाईसारख्या संस्थांच्या उपक्रमांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अशा प्रदर्शनांची गरज अधोरेखित करत, बेल्कॉनमुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा लाभ होईल, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशांत वांडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर युवराज हुलजी यांनी प्रास्ताविकातून बेल्कॉन प्रदर्शनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद कलघटगी यांनी केले.