बेळगाव / प्रतिनिधी
‘शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा…’ अशा जयघोषात शुक्रवारी सकाळी ७ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन बेळगावात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्याला शिवप्रेमी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती व सुनिल जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मूर्तीसमोर भव्य नैवेद्य अर्पण करण्यात आला असून संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. अवघ्या ३२व्या वर्षी १२८ युद्धे जिंकणारे संभाजी महाराज हे पराक्रमाचे जिवंत प्रतीक होते. युवराजपदापासून छत्रपतीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान हा इतिहासाचा सुवर्णक्षण आहे. त्यांनी २०१ लढाया लढल्या आणि एकाही लढाईत पराभूत झाले नाहीत. रयतेसमोर स्वराज्य व स्वधर्माचा आदर्श ठेवणाऱ्या या थोर राजाला मानाचा मुजरा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी मनोगतात सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या रक्षणासाठी अर्पण केले. कमी वयात सर्वाधिक युद्धे लढून शत्रूंवर विजय मिळवला. हा प्रेरणादायी इतिहास बेळगाव शहरात स्मारकाच्या माध्यमातून कायम जिवंत राहावा, यासाठी समिती प्रयत्नशील आहे. ‘जगावे कसे हे शिवरायांनी शिकवले, तर मरावे कसे हे शंभूराजांनी शिकवले,’ असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.”
या राज्याभिषेक सोहळ्यास नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, धर्मवीर संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, निशांत कुडे, मारुती पाटील, यश पाटील, आदित्य पाटील, सुशांत तरहळेकर, निखिल पाटील, उदित रेगे, किसन खांडेकर, योगेश भोसले, भरत काळगे यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








