बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील कपिलेश्वर विभागात येत्या १८ जानेवारी रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५.३० वाजता हे संमेलन पार पडणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली. ते बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंदू संमेलन समिती कपिलेश्वर विभागाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, जात, भाषा व प्रांत यामध्ये विभागलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. संमेलनाच्या निमित्ताने १८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून भव्य दिंडी काढण्यात येणार आहे.

या दिंडीत आळंदी ते पंढरपूर वारीतील अश्वसोहळ्यात सहभागी असलेले शितोळे सरकार यांचा सहभाग राहणार आहे. तसेच होन्नीहाळ येथील ब्रह्ममठाचे श्री बस महाराज आणि सव्यसाची गुरुकुलचे लखन जाधव यांचे मार्गदर्शन संमेलनाला लाभणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अन्नपूर्णा हंपीहोळी यांनी भारत हा सुसंस्कृत आणि ज्ञानसमृद्ध देश असल्याचे सांगितले. मात्र आधुनिकतेच्या आडून चुकीच्या प्रवृतींमुळे देश आपली मूळ संस्कृती विसरत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात सांस्कृतिक जागृती निर्माण करणे आणि ‘पंच परिवर्तन’चा संदेश देणे, या उद्देशानेच या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.