- अभियंते आर. एम. चौगुले
- समाज सारथी सेवा संघटनेच्या पहिल्याच महामेळावाला उत्स्फूर्त प्रतिसाद
येळ्ळूर, ता. १२ : आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत करणारे, मात्र स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणारे बांधकाम कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, काम करताना सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन म. ए. समितीचे नेते व अभियंते आर. एम. चौगुले यांनी केले. रविवारी (ता. ११) येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघटनेच्या वतीने आयोजित पहिल्याच बांधकाम कामगार महामेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात आयोजित या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती देत कामगार कार्डचे महत्त्व स्पष्ट केले आणि अधिकाधिक कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे प्रतिनिधी गणपती मुंबारे व सोनिया अनगोळकर यांनी बांधकाम कामगार, कंत्राटदार आणि अभियंत्यांसाठी कंपनीकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक यांनी समाज सारथी सेवा संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत मागास घटकांसाठी कार्य करण्याच्या जिद्दीबद्दल शुभेच्छा दिल्या. सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर यांनीही संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
या महामेळाव्यात समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर, निवृत्त पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार तसेच येळ्ळूरचे सुपुत्र व नौदलात लेफ्टनंटपदी निवड झालेले चंदन कुमार खेमणाकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने कामगारांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीच्या पूजनाने झाली. प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक अनिल हुंदरे व डी. जी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता उघाडे यांनी मानले. महामेळावा यशस्वी करण्यासाठी समाज सारथी सेवा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.








