- दोन सैनिक गंभीर जखमी ; ५० फूट उंचीवरून कोसळले
- हवाई मार्गाने बेंगळूरुला हलवले
बळ्ळारी : पॅराशूट प्रशिक्षण सत्रादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन सैनिक ५० फूट उंचीवरून जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना बळ्ळारीच्या बाहेरील भागात घडली. जखमी सैनिकांना तातडीने हवाई मार्गाने बेंगळूरुला हलवण्यात आले आहे.
पी. डी. हल्ली परिसरात ४१७ सैनिकांसाठी पॅराशूट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शनिवारी सकाळी प्रशिक्षणादरम्यान सैनिक ८०० फूट उंचीवरून उडी मारत असताना, जमिनीपासून सुमारे ५० फूट अंतरावर असताना दोन सैनिकांचे पॅराशूट अचानक निकामी झाले.
या घटनेत २५ वर्षीय चिन्नराज यांच्यासह दुसरा एक सैनिक खाली कोसळला. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परिस्थिती गंभीर असल्याने लष्करी अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना बेंगळूरुला हलवण्याचा निर्णय घेतला. आयटीआय कॉलेज मैदानावर उतरलेल्या लष्करी हेलिकॉप्टरद्वारे दोन्ही सैनिकांना कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.








