- भाजपची वनविभागाविरोधात निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील कौरी गुड्ड परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भाजप व शेतकरी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
बडाल अंकलगी परिसरात एका खासगी कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली असून, याबाबत वनविभागाने केवळ औपचारिक चौकशी करून प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अद्याप संबंधित विकासकावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक बळावला आहे.
कौरी गुड्ड हा परिसर हजारो मोरांसह विविध वन्यजीवांचा अधिवास असून, येथील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, मग हिरवागार वनक्षेत्र नष्ट करून सौर प्रकल्प उभारण्याची घाई का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वनक्षेत्रातील ५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील झाडे तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, यासाठी महसूल व संबंधित विभागातील काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी भाजप नेते धनंजय जाधव यांनी दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा दिला. आंदोलनात प्रेम चौगुला, वाजीद हिरेकुडी, बसनगौडा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







