
- दोषींवर कारवाईसाठी प्रशासनाला अल्टिमेटम
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथे सौर प्रकल्पाच्या नावाखाली वन विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. श्री कौरीगुडा रेणुका देवी मंदिर परिसरातील वनक्षेत्रात झालेल्या या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सौर प्रकल्पासाठी अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ५५ एकर ओसाड जमीन उपलब्ध असतानाही घनदाट जंगल क्षेत्राची निवड करण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या परिसरात १०,००० हून अधिक झाडे तोडण्यात आली असून त्यामध्ये चंदनासह इतर मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. ही झाडे उपटून नेण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हा प्रकार उघडकीस येताच भाजप बेळगाव ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
दोषींना बुधवारपर्यंत अटक करण्यात आली नाही, तर गुरुवारी सकाळी डीएफओ कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा धनंजय जाधव आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या या विनापरवाना वृक्षतोडीविरोधात कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.







