बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील आझाद नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका लहान मुलांनाही बसू लागला आहे. सहा ते सात कुत्र्यांच्या टोळीने दोन वर्षांचा अहमद रमीझ या चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली.
घरासमोर खेळत असताना अचानक कुत्र्यांनी मुलावर झडप घातली आणि त्याला गंभीर जखमा केल्या. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला असून तातडीने त्याला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटनांसाठी महानगरपालिका व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षालाच जबाबदार धरले जात आहे. सदर घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.








