• बेळगाव तालुक्याच्या विविध भागांत पिकांचे मोठे नुकसान
  • शेतकरी आर्थिक संकटात

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्याच्या उत्तर आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

या परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड केली जाते. मात्र अगसगे, हंदिगनूर, चलवेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी आदी गावांमध्ये बहरात असलेले ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पीक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अपेक्षित उत्पादन हातचे गेले आहे.

यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने ज्वारीचे पीक चांगले उभे राहिले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल आणि काही आर्थिक दिलासा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र अनपेक्षित पावसामुळे ही सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे.