• सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृह येथे कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी अचानक भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला. या अनपेक्षित पाहणीमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली.

कारागृहाच्या अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षेची त्यांनी बारकाईने तपासणी केली. कैद्यांवरील देखरेख, कर्मचारी वर्गाची कामकाज पद्धती आणि शिस्त याबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

तपासणीदरम्यान तांत्रिक सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. कारागृहात ५जी जॅमर यंत्रणा बसवूनही काही भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. तसेच कारागृहाच्या भिंतीबाहेरून मोबाईल फोन व अंमली पदार्थ आत फेकले जात असल्याच्या आरोपांवरही चर्चा झाली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचे बजावत निगराणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीस उत्तर विभागाचे आयजीपी टी. पी. शेषा, आयजीपी चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, एसपी के. रामराजन तसेच कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.