बेळगाव / प्रतिनिधी

गुरुदेव दत्तांचा वार असलेल्या गुरुवारीच दत्त जयंती आल्याचा अभूतपूर्व योग बेळगावकरांनी साधला. मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजनाबरोबरच श्री दत्त जयंतीचा योग साधला गेल्यामुळे भक्तगणांचा उत्साह द्विगुणित झाला होता. घरोघरी श्री दत्त पूजन तसेच सार्वजनिक स्वरूपात मंदिरांमधून दत्त जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन शहरभर करण्यात आले होते. त्यामुळे दत्त नामाचा गजर अखंडपणे सुरू होता. शहर परिसरात दत्त जयंती भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. काकड आरती, लघुरुद्राभिषेक, पूजा, महाआरती, तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दत्त मंदिरांवर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासूनच दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती.

शहरातील मारुती गल्ली दत्त मंदिर, नरगुंदकर भावे आनंदनगर- वडगाव, चौक, माधवपूर- वडगाव, शांतीनगर, टिळकवाडी, गोंधळी गल्ली, कलमेश्वर गल्ली – अनगोळ, कपिलेश्वर मंदिर, अनगोळ- दत्त मंदिर, कामत गल्ली दत्त मंदिर, दत्त गल्ली – वडगाव, महात्मा फुले रोड-शहापूर आदी ठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भजन, प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. अभिषेक, गुरुचरित्र पारायण,आरती, पाळणा, मंत्रपुष्प, जागर, तीर्थ प्रसाद आयोजित करण्यात आला होता.