• पहिल्याच दिवशी शेतकरी-व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव / प्रतिनिधी

राज्याच्या पणन खात्याने काही त्रुटींमुळे जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केटचा व्यापारी परवाना रद्द केल्यानंतर, बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) भाजी मार्केट तब्बल तीन वर्षे आठ महिन्यांनंतर पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. बुधवारी पहाटेपासूनच बाजार परिसर खरेदी–विक्रीच्या उलाढालीने गजबजून गेला होता.

३ जानेवारी २०२२ रोजी बंद पडलेले हे मार्केट १७ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा सुरू झाले. मंगळवारी काही किरकोळ विक्रेत्यांनी छोट्या प्रमाणात व्यापार केला होता; मात्र बुधवारी पहाटेपासून जिल्ह्यातील तसेच परगावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर कृषी माल येथे आणला.

भाजीपाला भरलेल्या ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचे एपीएमसी प्रशासन व शेतकरी नेत्यांकडून पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. एपीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पहिल्याच दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक आहे. पूर्वीप्रमाणे बाजार हळूहळू गजबजू लागला असून जवळपास ७५ ते ८० टक्के शेतकरी व्यापारासाठी उपस्थित होते.”

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल उत्साहाने खरेदी करून योग्य दर देण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, दोन कँटीन, शेतकऱ्यांच्या विसाव्यासाठी रयत भवन तसेच प्रशस्त पार्किंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वाहनांची कोंडी टाळण्यासाठी सुयोग्य वाहतूक व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्केटमधील गाळे ए, बी, सी, डी अशा चार इमारतींमध्ये विभागले असून यापैकी सुमारे १०० गाळ्यांमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत, तर अजून जवळपास १५० गाळे रिकामे आहेत.