- सदलगा पोलिसांच्या कारवाईत दोन आरोपी अटकेत
- चोरीच्या पाच दुचाकी जप्त
सदलगा : आंतरराज्यीय दुचाकी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत सदलगा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या वाहनचोरीच्या नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील शुभम राजू मन्नोळी आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आलाटे येथील आकाश प्रकाश वडेर यांचा समावेश आहे.
२२ जुलै २०२६ रोजी यू. एम. कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांच्या ताब्यातून पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई चिक्कोडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडा आणि चिक्कोडी सर्कलचे सीपीआय विश्वनाथ चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सदलगा पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार बिरादार, प्रा. पीएसआय आय. के. गौडवर, वाय. एस. कुरळी तसेच एस. एन. बदोडे, यू. एम. कांबळे, व्ही. के. कुंभार, व्ही. जी. हलबार, सी. एल. पुजेरी, आय. व्ही. घंटी, एस. के. बडकर, आर. एम. मुजावर, के. व्ही. बेलकेरी, के. एस. मधुर आणि बेळगाव तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर यांचा सहभाग होता.
आंतरराज्यीय वाहनचोरीच्या साखळीचा पर्दाफाश करत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी संपूर्ण तपास पथकाचे जाहीर कौतुक केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







