बेळगाव / प्रतिनिधी

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने मराठी आणि इंग्रजी फलकांना रंग फासण्यात आला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे तसेच भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासंदर्भात पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडून पाठविण्यात आले आहे.

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बाजारपेठेमध्ये महानगरपालिकेच्या वतीने मराठी आणि इंग्रजी फलकांवर बळजबरीने रंग लावण्यात आला तसेच कन्नड व्यतिरिक्त फलक जप्त करण्यात आले. त्या कार्यवाही संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करावे अशा आशयाचे पत्र पाठविण्यात आले होते. तसेच कन्नड फलक सक्तीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणावरही बळजबरी करू नये असा निकाल दिला होता,(WP ७५२५/२०२४) त्या निकालाची प्रत आणि फलकावर रंग फासण्याचे व्हिडिओ आणि फोटो पाठविण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा तपशील पाठविण्याच्या सूचना सुद्धा केंद्रीय अल्पसंख्यांक उपायुक्तांनी केल्या आहेत.तसेच गेल्या फेब्रुवारी महिन्यात उपायुक्तांनी बेळगाव दौरा केला होता, त्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारसंदर्भात, आणि मागण्यांबाबत काही उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत चर्चा आणि सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात काय कार्यवाही केली? असे पाचवे स्मरणपत्र भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ते ही जोडपत्र समितीला पाठविण्यात आले आहे.